जळगाव मिरर | १० मार्च २०२४
गेल्या काही महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील वाळूमाफियांचा धिंगाणा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मागील महिन्यात जळगाव उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर मध्यरात्री हल्ला केल्याच्या घटनेला महिना होत नाही तोच जिल्ह्याती फैजपूरच्या महिला डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग यांच्या खासगी वाहनाला डंपरची धडक देऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न वाळू माफियांनी केला. ही थरारक घटना शुक्रवारी रात्री ११:३० वाजता हिंगोणा शिवारातील पेट्रोल पंपासमोर घडली. याबाबत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर सुरेश कोळी (३०, रा. डांभुर्णी, ता. यावल), असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल रोडवर अवैध वाळ वाहतक होत असल्याची माहिती अन्नपूर्णा सिंग यांना मिळाली. यानंतर त्यांच्या पथकाने यावलहून फैजपूरकडे जाणाऱ्या वाळू इंपरला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, डंपर भरधाव वेगाने पुढे गेला. यानंतर पोलिस पथकाने या डंपरचा पाठलाग सुरू केला. पोलिस वाहन पुढे निघाले असता डंपर चालकाने पोलिसांच्या वाहनाला मागून डक दिली. धडक दिल्यानंतर डंपर बाजूला असलेल्या शेतात उलटले.
पोलिसांनी डंपर चालक मयूर कोळी याला ताब्यात घेतले, तर क्लीनर प्रशांत ऊर्फ दाद परुषोत्तम पाटील (रा. डांभुर्णी, ता. यावल) हा तिथून पळून गेला, तर डंपर मालक ज्ञानेश्वर ऊर्फ नाना नामदेव तायडे (रा. कोळन्हावी) यालाही आरोपी करण्यात आले आहे. पोलिस नाईक अल्ताफ अली यांच्या फिर्यादीवरून वरील तीनही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी तथा सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नीलेश वाघ, फौजदार बबन पाटोळे करीत आहेत. डीवायएसपींच्या पथकात पोलिस नाईक अल्ताफ अली, दिलीप तायडे, गणेश मनोरे, सुमित बाविस्कर यांचा समावेश होता.