जळगाव मिरर । २० सप्टेंबर २०२३
ठाकरे गट व भाजप नेत्यांची गेल्या काही दिवसापासून राजकीय जुगलबंदी रंगली आहे. यात आता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र केले आहे.
महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले कि, संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे. मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळ्यात मराठी माणसाची फसवणूक करुन कोट्यवधींची माया गोळा केली. कोव्हिडच्या काळात एका बाजूला लोक मृत्यूशी झुंजत होते, मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्यात ज्याने धन्यता मानली तो संजय राऊत आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
माधव गडकरी हे ज्येष्ठ संपादक होते, ते आज हवे होते त्यांनी संजय राऊतचं कर्तृत्व कसं आहे ते सांगितलं असतं. आपल्याविरोधात लोकांनी ओरड करु नये आणि तक्रार करु नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयात एका महिलेसंबंधीचं प्रकरण सुरु आहे. असे लोक माझ्यावर जर आरोप करत असतील तर मला काही फरक पडत नाही. आयुष्यभर ज्यांनी दलाली केली त्यांनी दुसऱ्यावर कशाला बोलायचं? अशा लोकांच्या वक्तव्याला प्रसिद्धी मिळते हेच आश्चर्यकारक आहे. हे सगळं माझ्या बदनामीचं षडयंत्र आहे असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. संगमनेरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांनी विखे पाटील यांच्यावर साखर कारखाना प्रकरणात आरोप केले. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे त्याने आयुष्यभर दलालीच केली आहे त्याच्या टीकेला कुठे महत्व देता? असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.