जळगाव मिरर | १६ नोव्हेबर २०२३
देशातील प्रत्येक महिलेला आरक्षण असतांना देखील राजकीय क्षेत्रात असलेल्या महिलांच्या सर्वच कारभार पती सांभाळताना नेहमीच दिसून येत असते. त्यामुळे अनेक महिलांना माहित देखील नसते आपण कुठल्या कागदावर सही करीत आहेत. अशीच एक घटना वाशिमच्या मानोरा तालुक्यातील गहुली गावात घडली आहे. पत्नी सरपंच असल्याने तिच्या पतीने लाभार्थीकडून १३ हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम स्वीकारताना सरपंच पती लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला.
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील गहुली येथील सरपंच गौकर्नाबाई विष्णू राठोड व त्यांचे पती विष्णू मंगु राठोड अशी लाच स्वीकारणाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदार यांचे एक घरकूल तसेच त्यांचे नातेवाईक यांचे एक घरकुल असे दोन घरकुल मंजूर होते. या घरकुलाच्या फाईलवर सही करण्याकरिता ४ हजार रुपये तसेच तक्रारदार यांचे नातेवाईक यांचे दोन विहिरीच्या फाईलवर सही करण्याकरिता १० हजार रुपये असे एकूण १४ हजार रुपयांची मागणी गहूलीच्या सरपंच गोकर्ण विष्णू राठोड व त्यांचे पती विष्णू राठोड यांनी केली.
दरम्यान तडजोडीअंती १३ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार ठरल्याप्रमाणे सरपंच पटीने तक्रारदाराकडून १३ हजार रुपये स्वीकारले. याचवेळी वाशिमच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने विष्णू राठोड यांना रंगेहाथ पकडत कारवाई केली. आरोपी यांचे विरुद्ध पोस्टे मानोरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.