प्राचीन महत्व लाभलेल्या भडगाव गावात स्व. चंद्रप्रभा साळुंखे या ऐश्वर्य संपन्न माहेर असलेल्या मातोश्रीच्या उदरी दि. १० ऑक्टोबर १९८० रोजी एक तेजस्वी तारा जन्माला आला. चांदसर येथे शेतकरी, कष्टकरी कुटुबात साळुंखे कुळाला आणि गावाला गौरव प्राप्त करून देण्यासाठीच झाला असावा अस आज त्यांचा जीवनपट पाहिल्यावर लक्षात येते. जीवन म्हणजे फुलांनी सजलेला मार्ग नसतो तर त्यात काटे ही असतातच. जो या अडचणीवर मात करतो तोच यशस्वी होतो. या जीवन सत्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पंकज साळुंखे. जीवन म्हणजे केवळ आनंदाचे क्षण नव्हे, तर संघर्षांच्या वादळातही उभे राहण्याचे धैर्य असते. या गोष्टीचा वास्तूपाठ म्हणजे श्री. साळुंखे यांचा जीवनप्रवास होय.
श्री. साळुंखे यांचे प्राथमिक शिक्षण चांदसर येथील जि. प. शाळेत तर माध्यमिक शिक्षण पाचवी ते बारावी श्री दत्त हायस्कूल चांदसर येथे पुर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी जळगाव येथील नूतन मराठा या महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे त्यांनी आपला पदवी अभ्यासक्रम बीए (इंग्रजी) व डीसीएम पूर्ण केले. काम करतांना नेहमी काम अचूक व नीटनेटके व्हावे यासाठी त्यांनी डिप्लोमा इन कोआपरेटिव्ह मॅनेजमेंट मध्ये प्राविण्य मिळविले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना त्यांचा या महाविद्यालयाचे प्राचार्य एल. पी. देशमुख यांच्याशी जवळचा संबंध आल्यामुळे व त्यांच्या परिसस्पर्शने श्री. साळुखे यांच्या जीवनात सामाजिक सेवा हा नवीन आयाम सुरु झाला.
श्री. साळुंखे यांचे मुळगाव चांदसर ता. धरणगाव हे आहे. त्यांचे वडील भिकनराव साळुंखे तर आईचे नाव कै. सौ. चंद्रप्रभा साळुंखे असे आहे. त्यांचे कुटुंब शेतकरी पण अत्यंत साध्या शिस्तबद्ध वातावरणात त्यांचे बालपण गेले. ते तीन भावंडांमध्ये मोठे असून त्यांनी आपल्या दोन्ही लहान भावांना उच्च शिक्षणासाठी सक्षमपणे उभे केले. त्यांचे बालपण व शिक्षण संघर्षमय स्थितीत गेले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या आयुष्यात उच्चशिक्षित दिपाली साळुंखे या त्यांच्या अर्धांगिनीचे आगमन झाले त्यामुळेच कौटुंबिक व शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना एक खंबीर साथ मिळाली. सततच्या धावपळीमुळे त्यांना वयाच्या तीसाव्या वर्षी ऑजिओप्लास्टीला सामोरे जावे लागले पण सर्वांच्या कृपाशीर्वादामुळे त्यांनी या संकटावर मात केली. याच परोपकारी विचारांची पावती म्हणून परमेश्वराने त्यांना चिरंजीव गौरांश नावाच्या अफाट बुद्धिमत्ता असलेल्या चाणक्याची भेट दिली आहे.
जिल्ह्यातील म्हसावद या गावाला आपली कर्मभूमी बनवली जिल्हयाच्या ठिकाणी न राहता म्हसावद या गावीच आपला निवास निवडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांनी लोकांच्या मनात घर केले. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थी शिक्षक पालक तसेच गावकरी त्यांना दादासाहेब या आदरार्थी नावाने संबोधतात. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी सहाय्य. स्वआधी परोपकार ही भावना असणाऱ्या श्री. साळुंखे यांनी सन २००२ साली शिक्षण क्षेत्र व सामाजिक क्षेत्र यात आपले पहिले पाऊल ठेवले. त्यांनी म्हसावद या ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शाळा व कै. सौ. चंद्रप्रभा भिकनराव साळुंखे कला व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय सुरु केले. आजच्या इंग्रजी माध्यमाच्या मोहातही त्यांनी आपल्या मुलाला स्वतःच्या शाळेत शिक्षणासाठी पाठवले आहे. त्यातूनच त्यांचे संस्थेवरील विश्वास व समाजात एक समतोल निर्माण करण्याची भूमिका स्पष्ट होते.
शैक्षणिक क्षेत्राप्रमाणेच आपल्या कार्याची गोड छबी श्री. साळुंखे यांच्या सामाजिक कार्यातून पण दिसून येते. समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तींना सन्मानाने व शिक्षणाने उभे करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यात गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो, शिवजयंती, ईदमिलन कार्यक्रम सोहळा असो की इतर अजून सुख दुःखाची प्रसंग ते सढळ हाताने मदत करतात. त्यांच्या संस्थेत सुद्धा एकात्मता, सर्वधर्मसमभाव, रूढीपरंपरा, सण उत्सव व संस्कृती जोपासले जातात. शाळा ही फक्त अभ्यासाची केंद्र नसून समाज-समरसतेचेही व्यासपीठ असावे, असा त्यांच्या कामाचा गाभा आहे.
दोन दिशांचा समांतर प्रवास १० ऑक्टोबरच्या दुहेरी दहा प्रतिकांशी त्यांच्या कामाचा सुर जुळतो. साधेपणा, प्रामाणिकपणा, संयम व सेवाभाव हे त्यांचे प्रमुख गुण आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व मातृहृदयी आहे. मैत्री जोपासणारे, दिलदार, कर्तव्यनिष्ठ व शिस्तप्रिय असे त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. एक आपली छोटीशी सुरुवात आणि त्यावर प्रामाणिकपणे केलेले काम त्या कामावर ठेवलेली निष्ठा आपल्याला कुठवर घेऊन जाते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे श्री. खाळुंखे. आनंदाने पालकत्व घेणे हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. मैत्रीचा खरा अर्थ म्हणजे दादासाहेब. ते कोणत्याही परिस्थितीत आपल्या मित्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात.
संकलन:- मैत्रीचे ऋणानुबंध आणि सत्रेहीजण.




















