जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२५
राज्यातील प्रत्येक शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा सोहळा सुरु असतांना धाराशिवमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. धाराशिवमध्ये शिवजयंती रॅलीदरम्यान तोफेचा स्फोट होऊन 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
काय घडली नेमकी घटना ?
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा गावामध्ये ही दुर्घटना घडली आहे. शिवजयंतीचा उत्साह आणि उत्कंठा शिगेला पोहोचलेली असताना मिरवणूक सुरू असतानाच तोफेचा स्फोट झाला आणि यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षता संतोष भराटे (वय 12, रा. पारा) आणि महेंद्र किंचन गवळी (वय 35, रा. पारा) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
महेंद्र किंचन गवळी याच्या गळ्याला जखम झाली आहे तर क्षता संतोष भराटे हिचा गाल भाजला आहे. धाराशिव च्या शासकीय रुग्णालयात दोघांवरही उपचार सुरू आहेत. स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. तोफेचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस या दुर्घटनेचा पुढील तपास करत आहेत.