जळगाव मिरर | ७ फेब्रुवारी २०२४
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या नियमित घटना घडत असतांना नुकतेच मुंबई-गोवा महामार्गावर मध्यरात्री एका खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. महाड येथे सावित्री नदीवरील पुलावर ही घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचं मोठं नुकसान झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री १.४५ वाजता बसमधील सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना धावत्या बसच्या टायरने अचानक पेट घेतला. टायरने पेट घेतल्यानंतर काही क्षणात बस आगीच्या भक्षस्थानी गेली. बसला आग लागली त्यावेळी बसमधून एकून १९ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने बसमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
घटनेची माहिती मिळताच काही वेळात पोलीस, अग्निशमन दलाचं जवान घटनस्थळी दाखल झाले. काही वेळात अग्नीशमन दलाच्या जवानांनी बसला लागलेली आग विझवली. मात्र बस जवळपास पूर्ण जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता.