जळगाव मिरर | ११ जून २०२५
शहरातील गेंदालाल मिल परिसरातील ऐलान चौकात गोवंशाची कत्तल करुन ते मांस एका ड्रममध्ये ठेवलेले होते. तर त्याच्या मागील शेडमध्ये एक गोह्याची एलसीबीसह शहर पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई दि. ९ रोजी गेंदालाल मिल परिसरात केली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गेंदालाल मिल परिसरातील ऐलान चौकातील एका घरात बेकायदेशीररित्या प्राण्यांची कत्तल होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच उपनिरीक्षक शरद बागल, प्रवीण भालेराव, रविंद्र कापडणे यांचे पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या. तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी सपोनि रामचंद्र शिखरे, विरेंद्र शिंदे, ओमप्रकाश सोनी, शिवाजी धुमाळ यांचे पथक तयार करुन एलसीबीच्या पथकासोबत संयुक्त कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर पथकाने गेंदालाल मिल परिसरात धाव घेत एका घरात धाड टाकली. याठिकाणी बाथरुममध्ये रक्ताचे डाक आणि त्याठिकाणी चार सुरे, तीन कुऱ्हाडी मिळून आल्या.
पथकाने घराची झडती घेतली असता, त्यांना स्वयंपाक घरातील किचन ओट्याखाली निळ्या रंगाच्या ड्रममध्ये गोवंशाची कत्तल केलेल्या प्राण्याचे मांस मिळून आले. तसेच बाजूच्या पत्राच्या खोलीत एक गोऱ्हा मिळून आला. पोलिसांनी त्याची सुटका करीत गो-शाळेत रवानगी केली. याप्रकरणी रविंद्र कापडणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रिहान शफिक उल रहमान (वय २२, रा. मासुमवाडी), लुकया बी रशिद खान (वय ५५, रा. गेंदालाल मिल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ ओमप्रकाश सोनी हे करीत आहे.
