जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२४
गेल्या काही वर्षापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारी घटनामध्ये पोलीस विभागातील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे नेहमीच दिसून आले आहे. तर नुकतेच जळगाव शहरातील १६ लाख प्रकरणी देखील शहर पोलीस स्थानकाच्या तीन कर्मचाऱ्यांचा सहभाग दिसून आला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येवू लागले आहे. गुंतवणुक केलेलेल्या रकमेच्या तिप्पट करुन देणाऱ्यांचा पोलिसांनी मंगळवारी पर्दाफाश केला. यामध्ये अटकेत असलेल्या तिघ पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर दोघांचा जप्त केलेल्या रकमेत कुणाचा किती वाटा होता याची चौकशी केली जात आहे. मुख्य संशयित सचिन धुमाळ याने स्वतःचे २० लाख रुपये असे सांगितले, मात्र त्याने या गुन्ह्यातील मास्टरमाईंड योगेश शेळके याच्या सांगण्यावरून लाकडी ठोकळ्यांवर पाचशे रुपयांच्या नोटा चिकटवून बनावट रक्कम तयार केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील ग्रामसेवक विकास मच्छिद्र पाटील (वय ४१) यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याठिकाणी मैत्रीकरुन सचिन धुमाळ याने गुंतवणुकीची रककम तीनपट करुन देण्याचे अमीष दाखविले. त्यानंतर ग्रामसेवक विकास पाटील हे १६ लाख रुपये घेऊन जळगावात आल्यानंतर ते पैसे देण्यासाठी रेल्वे स्टेशनावर गेले होते. याठिकाणी सचिन धुमाळ याने विकास पाटील आणि त्याच्याजवळ असलेली पैशांची बॅग समोरील व्यक्तीच्या हातात दिली. त्यानंतर त्याठिकाणी गणवेशावर तीन पोलीस कर्मचारी तेथे आले. त्यांनी रोकड घेवून जाणाऱ्याला ताब्यात घेत ती रोकड गायब केल्याचा प्रकार सोमवारी घडला. याप्रकरणी ग्रामसेवकाने दिलेल्या तक्रारीवरुन सचिन धुमाळ, पोउनि प्रकाश मेढे, पोलिस नाईक योगेश शेळके, पोकों दिनेश त्र्यंबक भोई, नीलेश अहिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. या पाचही जणांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.
पोलिसांनी जप्त केलेल्या १६ लाखांच्या रकमेत कुणाचा किती वाटा होता याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. तसेच सचिन धुमाळ याने स्वतः चे २० लाख रुपये असे सांगितले, मात्र त्याने योगेश शेळके याच्या सांगण्यावरून लाकडी ठोकळ्यांवर पाचशे रुपये मुल्याच्या नोटा चिकटवून बनावट रक्कम तयार केल्याचे आढळून आले आहे. तसेच संशयितांच्या बँक स्टेटमेंटची देखील चौकशी केली जाणार आहे.
अटकेतील संशयीतांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी यापूर्वीही अशाच पद्धतीने काही जणांना गंडा घातल्याची कबुली दिली आहे. त्यांनी कोणा-कोणाची फसवणूक केली, त्यापैकी कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे का याची चौकशी केली जाणार आहे. तसेच सचिन धुमाळ याने रक्कम तीनपट करुन देण्यासाठी ज्या बॅगमध्ये रोकड घेवून गेला ती बॅग अद्याप काढून दिलेली नसून त्याचा देखील पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.