जळगाव मिरर | १३ ऑक्टोबर २०२४
राज्यात सर्वत्र दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना दि.१३ शनिवार रोजी रात्रीच्या सुमारास अजित पवार गटाचे वांद्रे येथील नेते माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली. गोळीबार करणारे दोन संशयीत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे. करनेल सिंग (हरियाणा) आणि धर्मराज कश्यप (उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, सिद्दिकी सलमान खानचे निकटवर्तीय असल्याने पोलिसांनी बिश्नोई गॅंग तसेच वांद्रे परिसरातील ज्ञानेश्वर नगर एसआरए प्रकल्प या दोन्ही अँगलने तपास सुरू केला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी चौकशी करत आहेत. या कामासाठी आरोपींना आगाऊ पैसे दिले जात होते. त्यांना काही दिवसांपूर्वी शस्त्र मिळाली होती. गेल्या ८ तासांपासून मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून आरोपींची चौकशी सुरू आहे.
गोळीबारात वापरलेली पिस्तूल पोलिसांनी जप्त केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ ते ४ राऊंड फायर करण्यात आले. यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. निवडणुकीपूर्वीच त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. १५ दिवसांपूर्वी त्यांना जीवे धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.