जळगाव मिरर । ६ ऑक्टोबर २०२५
जयपूर येथील सवाई मानसिंग रूग्णालयातील आयसीयुला रविवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. या आगीत आतापर्यंत ८ रूग्णांचा मृत्यू झाला असून ५ रूग्ण अत्यंत गंभीर झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी सांगितलं की आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्कीटमुळं लागली असण्याची शक्यता आहे.
जयपूर पोलीस कमिश्नर बिजू जॉर्ज जोसेफ म्हणाले, ‘प्राथम दर्शनी ही आग शॉर्ट सर्कीटमुळं लागली असल्याचं दिसत आहे. मात्र एफएसएलच्या तपासणीनंतर या आगीचं नेमकं कारण समजू शकले.’ सवाई मानसिंग रूग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरचे प्रमुख अनुराग धाकड यांनी एएनआयला सांगितलं की, दुसऱ्या मजल्यावर असलेल्या ट्रॉमा आयसीयूला आग लागली.
धाकड म्हणाले, ‘आमच्या ट्रॉमा सेंटरचे दोन आयसीयू आहेत. त्यातील दुसऱ्या मजल्यावरील आयसीयू आणि सेमी आयसीयूला आग लागली. तिथं आमच्याकडे २४ रूग्णहोते. ११ हे ट्रॉमा आयसीयू आणि १३ सेमी आयसीयूमध्ये होते. ट्रॉमा आयसीयूमध्ये शॉर्ट सर्कीट झालं. त्यानंतर आग झपाट्यानं पसरली. तसंच विषारी वायू देखील पसरला.’
धाकड यांनी सांगितलं की, आमच्या आयसीयूमधील बरेच पेशंट हे कोमामध्ये होते. ते म्हणाले, ‘आमची ट्रॉमा सेंटर टीम आणि नर्सिंग स्टाफ, वॉर्ड बॉय यांनी त्वरित त्यांना वाचवलं. त्यांनी जेवढे शक्य आहेत तेवढे रूग्ण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. यातील सहा रूग्ण हे अतिशय गंभीर होते. आम्ही त्यांना सीपीआर देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते वाचू शकले नाहीत. धाकड यांच्या मते मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरूषांचा समावेश आहे. तर पाच रूग्ण अजूनही गंभीर आहेत. प्रशासन शॉर्ट सर्कीटचे नेमकं कारण शोधत आहे. दरम्यान, पीडितांच्या नातेवाईकांनी रूग्णालय प्रशासनावर सुरक्षेत कसूर ठेवल्याचा आणि कर्मचाऱ्यांनी उशिरा प्रतिसाद दिल्याचा आरोप केला आहे.




















