जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२५
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून विनयभंग व अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतांना आता पाचोरा तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील एका गावात गेल्या महिन्यात घडली.
पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोरा तालुक्यातील एका गावातील काही विद्यार्थी शिक्षणासाठी जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे स्कूल बसने ये-जा करतात. गेल्या महिन्यात अबिद हा दुचाकीने संबंधित मुलीच्या गावात आला होता. तेव्हा ही मुलगी बाहेर जात असताना संशयिताने ‘तू मला आवडतेस’ म्हणून पाठलाग करीत विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली होती. अबिद हुसेन शेख जलील (वय ३८) असे अटक केलेल्या बसचालकाचे नाव असून पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरुध्द १९ ऑगस्ट रोजी पोलिसात बलात्कारासह पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पाचोरा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलीने गुरुवारी पुरवणी जबाब दिला. त्यात म्हटले आहे की, बसचालकाने माळेगाव (ता. जामनेर) येथील शेतात नेऊन बलात्कार केला. तसेच या मुलीला फोनवरून वारंवार धमकावत व अश्लील बोलत छळ केला. संबंधित गावातून दररोज ५० ते ६० विद्यार्थी-विद्यार्थिनी स्कूल बसने ये-जा करतात. त्यांचीही बसचालकाने या आधी छेड काढली काय? याबाबतही पोलिस तपास करीत आहेत.