
जळगाव मिरर । १ जानेवारी २०२३
सरत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाच्या स्वागतासाठी देश जल्लोष करीत असतांना धरणगावात एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
मिळालेली माहिती अशी की, धरणगाव – जळगाव रोडवर एका जिनींगमध्ये कामाला असलेल्या अरूण रमेश भील उर्फ कालू (वय ३० वर्षे) या तरूणाची रात्री नऊच्या सुमारास क्रूर हत्या करण्यात आली. ही माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस स्थानकाचे पीआय राहूल खताळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या संदर्भात धरणगाव पोलीस स्थानकात भादंवि कलम ३०२, १४१, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद संदानशीव, राजेंद्र पाटील, जिभाऊ पाटील, राहूल गुंजाळ व संजय सूर्यवंशी, नाना ठाकरे, प्रमोद पाटील, मिलींद सोनार हे करीत आहेत. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणाती परिसरात झाडाझडती सुरू होती. यात चौकशीसाठी काहींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.




















