जळगाव मिरर | १५ जुलै २०२५
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आज बैठक पार पडली. या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या या पदावर जयंत पाटील होते. पाटील यांनी राजीनामा दिला असून आता या पदावर शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे यांची निवड ही एकमताने करण्यात आली. शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू नेते मानले जातात. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाल्याची चर्चा आहे. मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाची चर्चा सुरू होती. सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेल्या सात वर्षांपासून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. या आधीच्या एका कार्यक्रमात त्यांनी आपल्याला या पदावरून मुक्त करावे आणि नव्या लोकांना संधी द्यावी अशी जाहीर मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चाही सुरू झाली. त्यानंतर आज अखेर पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे.
कोण आहेत शशिकांत शिंदे?
शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. वडील जयवंतराव शिंदे आणि आई कौसल्या शिंदे यांच्या सुसंस्कृत आणि प्रेमळ वातावरणात त्यांचे बालपण गेले.
– लहान वयातच समाजकारण आणि राजकारणात ते सक्रिय.
– 1999 साली प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.
– महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून काम पाहिले आहे.
– 2009 ते 2014 या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले.
– दोन पंचवार्षिक जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार
– दोन पंचवार्षिक कालावधीसाठी कोरेगावचे आमदारही होते.
– 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव महेश शिंदे यांनी केला.
– सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून भाजपच्या महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
– यानंतर विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदेंविरोधात त्यांचा पराभव झाला होता.
– सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषद आमदार आणि शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत. आता त्यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे.
– शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही त्यांनी शरद पवारांची साथ दिली.
