जळगाव मिरर | १९ जुलै २०२४
शेततळे निविदा प्रक्रियेत गैरप्रकार करणारे वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता गोकूळ महाजन यांना सेवेतून निलंबित करून निविदा प्रक्रियेची चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जळगाव महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (शरद पवार गट) दिला आहे. यासंदर्भात जळगाव महानगर युवक पदाधिकाऱ्यांनी पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता भदाणे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
महाजन यांनी शासकीय कर्तव्यात हयगय करून सेवा शिस्तीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ सेवेतून निलंबित करून शेततळे निविदा कामांची विशेष तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी. याप्रकरणी ७ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देताना महानगर अध्यक्ष रिंकू उमाकांत चौधरी, हितेश रवींद्र जावळे, चेतन पवार, शैलेश अभंगे, ललित चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते