जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२४
राज्यातील बाळासाहेब ठाकरे यांनी वाढवलेल्या शिवसेनेत मोठी फुट पडली, त्यात एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेची सर्वच सूत्र आली आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीत देखील अजित पवार यांच्यासह मोठा गट बाहेर पडत चिन्हासह राष्ट्रवादी त्यांच्या ताब्यात गेली आहे मात्र आता शरद पवारांनी ८४ व्या वर्षी पक्ष गेला… चिन्ह गेलं… असून त्यांच्यावर मोठं राजकीय संकट ओढावलंय. एवढा मोठा आघात झाला तर एखादी व्यक्ती खचून जाईल. मात्र रडायचं नाही तर लढायचं, या वृत्तीने शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. सगळं काही हातून गेलं असताना, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पुन्हा दंड थोपटले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार मैदानात उतरणार आहेत. शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. दिल्लीतून आल्यानंतर पुढच्या आठवड्यात शरद पवार नव्या जोमाने कामाला लागणार आहेत. पक्ष आणि चिन्ह गेल्यानतंर शरद पवार लोकांमध्ये जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यासाठी शरद पवार राज्यव्यापी दौरा करण्याची शक्यता आहे.
पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीतून शरद पवार आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचं बोललं जात आहे. येत्या १५ ,१६ आणि १७ तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार दौरा करणार आहे. त्यानंतर १८ तारखेला पवारांचा पुरंदर दौरा असणार आहे. तर २१ फेब्रुवारीला आंबेगाव येथे दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात दौरा असणार आहे.
पक्ष आणि चिन्ह गेले तरी जनता आपल्यासोबत आहे असं शरद पवार गटाचे नेते सांगत आहे. घड्याळ हातून गेले असलं तरी मनगट आमच्याकडे आहे. लढाईत नेहमी मनगटच कामी येत असतं. शरद पवार आमचे मनगट अन् त्यात असलेला जोर पुन्हा एकदा महाराष्ट्रात जादू करेल, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. तर जखमी वाघ अधिक धोकादायक असतो, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. अशा स्थितीत शरद पवार हे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाचा आश्वासक चेहरा आहेत. त्यांच्या मार्फत पक्षाचं नवीन नाव आणि चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे शरद पवारांचा हा मास्टरप्लान किती यशस्वी होईल, हे येत्या काळात स्पष्ट होईल.