जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२५
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुन्हा एकदा शरद पवार मैदानात उतरणार आहेत. हमीभाव, पीक विमा अशा शेतकऱ्यांशी संंबंधित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शरद पवार गटाकडून १५ सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. १४ सप्टेंबरला कार्यकर्ता शिबीर आणि दुसऱ्या दिवशी मोर्चा नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.
केंद्र सरकारने अकस्मात लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद स्थानिक पातळीवर उमटत होते. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. ज्यात शरद पवार हे सहभागी झाले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांवरून पक्षाने नाशिकमध्ये मोर्चा आयोजित केला आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी नाशिक दौऱ्यात पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने १५ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या अन्य ज्वलंत प्रश्नांवर सरकारला जाब विचारला जाणार आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. आदरणीय पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने व सर्व नेत्यांच्या पाठिंब्याने हा मोर्चा ऐतिहासिक होणार आहे. मोर्चाच्या तयारीसंदर्भात नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी, निरीक्षक आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून अधिकाधिक शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.