जळगाव मिरर । २९ नोव्हेबर २०२२
शिंदे व भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर ठाकरे गटाने आता पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने शिवसेना ठाकरे गटासोबत युती करण्याची घोषणा केली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. रेखा ठाकूर यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अन्य नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठका सकारात्मक झाल्या होत्या. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला युतीसाठी होकार कळवला असल्याची माहिती त्यांनी दिली.
