
जळगाव मिरर | १२ मार्च २०२६
पाचोरा शहरातील हनुमान नगर परिसरात बाथरूममधील वॉटर हिटरचा शॉक लागल्याने ४४ वर्षीय फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव धनराज सुखदेव मिस्तरी (वय ४४) असे असून ते हनुमान नगर येथील ए-वन काट्याजवळ वास्तव्यास होते. मिळालेल्या माहितीनुसार, धनराज मिस्तरी हे ११ मार्च रोजी सकाळी सुमारे ८ वाजेच्या सुमारास घरातील बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेले होते. त्या वेळी बाथरूममध्ये असलेल्या वॉटर हिटरला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
या घटनेत ते जागीच बेशुद्ध पडले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत करीत आहेत.
धनराज मिस्तरी हे व्यवसायाने फर्निचर कारागीर होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच दोन बहिणी असा परिवार आहे. अत्यंत शांत आणि मनमिळाऊ स्वभावामुळे परिसरात त्यांची ओळख होती. त्यांच्या अकस्मात निधनाने हनुमान नगर परिसरात शोककळा पसरली आहे.



















