जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२६
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते व उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे कट्टर समर्थक सुदाम बोडके (वय ६३) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आपल्या लाडक्या नेत्याच्या अकाली निधनाचा धक्का सहन न झाल्यानेच हा हृदयविकाराचा झटका आल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत असून, या घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुदाम बोडके हे त्यांच्या एका नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची बातमी समजली. ही बातमी ऐकून त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. उपस्थितांसमोर त्यांनी अजितदादांविषयी भरभरून भावना व्यक्त केल्यानंतर ते आपल्या दुचाकीवरून नाशिकच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान, नाशिकच्या मार्केट यार्ड परिसरात पोहोचल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी तत्काळ एका खासगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि डॉक्टरांसमोरच ते कोसळले. डॉक्टरांनी तातडीने उपचार केले, मात्र सुदाम बोडके यांना वाचवता आले नाही. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे घोषित केले.
सुदाम बोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात ते सक्रिय होते. अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने दिंडोरी तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंड असा मोठा परिवार आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल सकाळी बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत लाखोंच्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. “एक अत्यंत कार्यक्षम आणि कामाचा नेता हरपला,” अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.





















