जळगाव मिरर | ९ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना जळगाव लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीने नाव जाहीर केल्यानंतर भाजपाच्या उमेदवार बदलीची चर्चा सुरु असतांना आता रावेर मतदार संघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. उद्योजक श्रीराम पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु झाल्या आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले श्रीराम उद्योग समूहाचे चेअरमन तथा प्रसिद्ध उद्योगपती श्रीराम पाटील हे १४ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपात दाखल झाले होते. त्यानंतर आज शरद पवार गटातर्फे रावेर लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यात येणार असून त्यांचे नाव रावेर लोकसभा मतदार संघासाठी निश्चित मानले जात आहे. नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्रजी पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. आमदार जितेंद्र आव्हाड व अन्य मान्यवर उपस्थित होते.