जळगाव मिरर | १३ मार्च २०२४
खान्देशातील कॉंग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री पदमाकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला अजून एक धक्का बसला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नंदुरबारमध्ये असतानाच मंगळवारी वळवी यांनी मुंबईमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती.
पदमाकर वळवी हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास राज्यमंत्री तसेच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री देखील राहिले आहेत. मंत्रिपद मिळूनही त्यांचा कार्यकाल उल्लेखनीय राहिला नाही. त्यांच्या कन्या सीमा वळवी यांनी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपददेखील भूषविले आहे. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पदमाकर वळवी हे शहादा- तळोदा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराकडून पराभूत झाले आहेत. वळवी यांचे नाव २००२ मध्ये अधिक चर्चेत आले.
आज दि.१३ रोजी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख, प्रदेश सचिव अर्चनाताई राठोड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन, अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती.
