जळगाव मिरर | २० फेब्रुवारी २०२५
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटनाचे सत्र सुरु असतांना आता कल्याण येथून दादरला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय तरुणाने तीन प्रवाशांवर चाकूने हल्ला केला आहे. किरकोळ कारणावरून या तरुणाने थेट चाकूने हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. धक्का लागण्याच्या अतिशय क्षुल्लक कारणावरून हा हल्ला झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण ते दादर या जलद लोकलमध्ये गर्दी होती. यात 19 वर्षीय शेख जिया हुसेन नामक तरुण प्रवास करत होता. कल्याण-डोंबिवली दरम्यान गर्दी असल्याने काही प्रवाशांचा त्याला धक्का लागला. या कारणावरून त्याने थेट तिघांवर चाकूने हल्ला केला आहे. शेख जिया हुसेन याला उमऱ्याला उतरायचे होते मात्र जलद लोकल ही या स्थानकावर थांबत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. यावेळी उतरण्यासाठी त्याने इतर प्रवाशांना धक्काबुक्की केली होती. याचे रूपांतर वादात झाले आणि पुढे त्याने थेट त्याच्याकडील चाकू काढून हल्ला करण्यास सुरुवात केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शेख जिया हुसेन या तरूनवर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई येथील लोकलमध्ये अनेक स्टंटबाजीचे प्रकार देखील पाहायला मिळतात. तरुण कुठल्या दिशेला जात आहेत असा प्रश्न समाजात उपस्थित होत आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून यात तरुण मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत आहे. लोकलमध्ये 19 वर्षीय तरुणाने केलेला चाकू हल्ला हे अत्यंत धक्कादायक असून यावर पोलिस प्रशासन काय कारवाई करणार तसेच अशा प्रकारांना आळा बसवण्यासाठी काय उपाययोजना केली जाते याकडे लक्ष असणार आहे.