जळगाव मिरर | ९ ऑक्टोबर २०२४
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच एका निष्ठुर बापाने आपल्या पोटच्या मुलाला दोरीच्या साहाय्याने घराच्या छताला उलटे टांगल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे घडली आहे. प्रेमप्रकरणातून पत्नीला मारहाण करीत असताना सहावर्षीय चिमुकला आईजवळ आल्याच्या रागातून बापाने चिमुकल्यालाही मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने पोटच्या गोळ्याला दोरीच्या साहाय्याने घराच्या छताला उलटे टांगले. या घटनेबाबत पत्नी सुनीता बेंडकुळे (२२) हिने दिलेल्या फिर्यादीवरून वडनेरभैरव पोलिसांनी संशयित पती मंगेश केदू बेंडकुळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसात फिर्यादीनुसार, पती मंगेश याचे बाहेर कुणाशी तरी प्रेमसंबंध आहेत. त्यावरून तो वाद घालत सुनीता यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत होता. हे पाहून मुलगा नीलेश (६) याने आईकडे धाव घेतली होती. याचा राग संशयित आरोपीला येऊन त्याने मुलालाही मारहाण केली. त्यानंतर दोरीच्या साहाय्याने मुलाला घराच्या छताच्या पाइपला १० ते १५ मिनिटे उलटे टांगले होते. मुलगा आक्रोश करीत असतानाही बापावर त्याचा कोणताच परिणाम झाला नाही. मंगेशने सासरच्या मंडळींना शिवीगाळ करीत पत्नीला घर सोड अन्यथा जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसांना समजताच त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे अधिक तपास करीत आहेत.