जळगाव मिरर | १४ सप्टेंबर २०२५
पती कामावर तर दोघ मुल शाळेत गेलेली असतांना, घरी कोणीही नसल्याची संधी साधत अनिता किरण कोळी (वय ३१, रा. हरिविठ्ठल नगर) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी मुले शाळेतून आले त्या वेळी उघडकीस आली. विवाहितेच्या माहेरच्यांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला असून या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या अनिता कोळी यांचे पती केबल ऑपरेटर म्हणून काम करतात. या दाम्पत्यास एक मुलगा व एक मुलगी असून शुक्रवारी पती कामावर गेले होते, तर दोघ मुले शाळेत गेले होते. त्या वेळी घरी एकट्याच असलेल्या अनिता कोळी यांनी घराच्या मागील खोलीत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुले घरी आले त्या वेळी त्यांना आई गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यावेळी मुलांनी आजूबाजूच्या नागरिकांना हा प्रकार सांगितला. नागरिकांनी रामानंद नगर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अजित पाटील करीत आहेत. मयत अनिता कोळी यांनी आत्महत्या केली नसून त्यांच्यासोबत घातपात ‘झाल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्यांनी केला आहे. याबाबतचा तक्रार अर्ज त्यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिला असून त्यात घातपाताचा संशय व्यक्त केला. या अर्जानुसार पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.