
जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२५
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका 39 वर्षीय तरुणावर अमानुष हल्ला करण्यात आला आणि त्याच्या पत्नीचे अपहरण करण्यात आले. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे संतापाची लाट उसळली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, गेल्या काही दिवसांपूर्वी आळंदी येथे विश्वनाथ बबन गोसावी (वय ३९) आणि प्राजक्ता (वय २८) यांनी वैदिक पद्धतीने आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, प्राजक्ताच्या कुटुंबीयांना हा विवाह मान्य नव्हता. विवाहामुळे “कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठा” घसरल्याचा राग मनात ठेवून प्राजक्ताची आई, दोन भाऊ आणि इतर सुमारे १५ जणांनी विश्वनाथच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला. विश्वनाथवर जोरदार मारहाण करून प्राजक्ताचे अपहरण करण्यात आले. ही घटना भरदिवसा गावाच्या चौकात घडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी हा धक्कादायक प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. व्हिडीओत आरोपींचा जमाव विवाहितेला जबरदस्तीने वाहनात ढकलून नेत असल्याचे स्पष्ट दिसते.
या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. खेड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. विश्वनाथ सध्या गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत असून, प्राजक्ताचा ठावठिकाणा अद्यापही लागलेला नाही. प्रेम आणि विवाह स्वातंत्र्याच्या घटनात्मक हक्कावर असा हल्ला झाल्याने अनेकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. घटनास्थळावरून मिळालेला व्हिडीओ पुरावा म्हणून वापरण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.





















