जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२४
जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे अंगाचा थरकाप उडवणारी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. पती-पत्नीच्या आपसातील वादातून पतीने आपल्या पत्नीसह ११ महिन्यांच्या मुलीची हत्या केली व त्यानंतर दुधलगाव (ता. मलकापूर) येथे जाऊन विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली शुक्रवारी (दि. १२) या घटनेमुळे जामनेर तालुका हादरला असून, देऊळगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव गुजरी येथील पोलीस पाटील राजू इंगळे यांची कन्या प्रतिभा हिचा विवाह दुधलगाव येथील विशाल मधुकर झनके याच्याशी विवाह झाला होता. पतीला सुरुवातीला मद्याचे व्यसन असल्याने छोटी-मोठी कुरबुर व्हायची. परंतु, गेल्या काही काळात विशालने प्रतिभाचा मानसिक व शारीरिक छळ करणे सुरू केले. दोन लहान मुली व त्यातच पतीचे दारूचे व्यसन याचा त्रास असह्य झाल्याने गत चार महिन्यांपासून प्रतिभा पतीला सोडून ११ महिन्यांच्या मुलीसह माहेरी निघून आली होती. मध्यंतरी विशालने प्रतिभाची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला. परंतु, प्रतिभाने त्यास नकार दिला. शुक्रवारी देऊळगाव गुजरी येथे प्रतिभाचे आई-वडील शेतात गेले असताना विशाल पुन्हा प्रतिभाला नेण्यासाठी तसेच तिची समजूत घालण्यासाठी आला होता. प्रतिभाने त्याच्या सोबत जाण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण होऊन विशालचा राग अनावर झाला व त्याने धारदार शस्त्राने प्रतिभा आणि चिमुकल्या दिव्याची गळा कापून हत्या केली व तेथून फरार झाला. प्रतिभाच्या वडिलांना ही माहिती समजताच त्यांनी घरी धाव घेतली, त्यावेळी त्यांना आपली मुलगी प्रतिभा व नात दिव्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच जळगाव येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त, पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच फत्तेपूर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी देऊळगावकडे धाव घेतली. पत्नी व चिमुकल्या मुलीचा खून करून फरार झालेल्या विशालने दुधलगाव गाठले व कमरेला दगड बांधून गावातील एका विहिरीत उडी घेऊन त्याने स्वतःचेही जीवन संपविले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश फड व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.