
जळगाव मिरर | २८ मार्च २०२६
अमळनेर शहरातील अमलेश्वर नगर परिसरात २७ रोजी रात्री दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली. गावठी कट्टा हाताळताना कद्वयातून सुटलेल्या गोळीबारात अरुण सुरेश महाजन (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाल्याची ही घटना रात्री सुमारे ९:१५ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर नगर परिसरातील एका मुलाकडे गावठी कट्टा होता. अरुण महाजन यांनी त्याला तो कट्टा दाखवण्यास सांगितले असता, अचानक त्यातून गोळी सुटली. ही गोळी त्यांच्या डाव्या खांद्याजवळ लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अरुण महाजन हे अमलेश्वर नगर परिसरातील रहिवासी असून अतिशय कष्टाळू होतकरू व सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जात होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली, आई- वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.
या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तपास सुरू केला असून संबंधित मुलाकडील गावठी कट्टा नेमका कुठून आला, तो कशासाठी ठेवण्यात आला होता, याबाबत उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे.






















