जळगाव मिरर । ६ ऑक्टोबर २०२५
कुसुंबा येथील गणपती नगरात शनिवार, ४ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास चंद्रशेखर त्र्यंबक पाटील या कुरिअर कर्मचाऱ्याच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार आणि जोरदार दगडफेक केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या ८ ते १० हल्लेखोरांनी ३ वेळा गोळीबार केल्याने परिसरात दहशत पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर त्र्यंबक पाटील (वय ५५, व्यवसाय, कुरिअर कर्मचारी) हे पत्नीसोबत घरात जेवण करत असताना हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक काही दुचाकी त्यांच्या घरासमोर थांबल्या. दुचाकीवरून उतरलेल्या ८ ते १० हल्लेखोरांनी आधी शिवीगाळ करत घराच्या दिशेने जोरदार दगडफेक सुरू केली. दगडफेक करूनही हल्लेखोर थांबले नाहीत. त्यातील काही जणांनी आपल्याजवळील शस्त्राने घराच्या दिशेने तीन राउंड फायर केले. अचानक झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने पाटील कुटुंब आणि शेजारील नागरिक प्रचंड घाबरले. या हल्ल्यात पाटील यांच्या घराचे आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्यामागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट असले तरी जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून गोळीबाराच्या दोन रिकाम्या पुंगळ्या घराबाहेरून आणि एक घरातून जप्त केली आहे. तसेच, फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. या हल्ल्याप्रकरणी ८ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये किरण खर्चे, सचिन सोनवणे, गणेश उर्फ विकी ज्ञानेश्वर, हर्षल महाडीक, निखिल चव्हाण, रवी राठोड, राकेश पाटील, दिनेश पवार अशा ८ जणांचा समावेश आहे. यातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.




















