
जळगाव मिरर / ३० डिसेंबर २०२२
७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण तिच्या कानातील सोन्याचे दागिना निघत नसल्याने दरोडेखोरांनी अखेर महिलेचा कान कापून कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे किल्लू आणि रोख रक्कम दरोडेखोरांनी चोरुन नेल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील रेल येथे घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील रेल या गावात ७० वर्षीय वृद्ध घरी असताना तालुक्यातील रेल गावातील रहिवाशी असलेल्या विमलबाई श्रीराम पाटील (वय ७० वर्ष) या गावातील मंगल नथ्थू पाटील याच्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्याला आहेत. २९ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोर त्यांच्या घरात घुसला. यावेळी विमलबाई पाटील या खाटीवर झोपलेल्या होत्या. यावेळी दरोडेखोराने विमलबाई यांना डोक्यावर आणि तोंडावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. यावेळी दरोडेखोराने विमलबाई यांच्या कानातले सोन्याचे दागिने ओरबाडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निघत नसल्याने दरोडेखोराने थेट वृद्ध महिलेचा कानच कापला. विमलबाई यांच्या कानातले २५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला. या घटनेत विमलबाई यांना मोठी दुखापत झाली असून त्यांच्या कानातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्या जखमी झाल्या. दरम्यान, सकाळी ९ वाजले तरी आजी उठल्या नाही म्हणून शेजारी राहणाऱ्या महिला घरी गेल्याने हा प्रकार उघडकीला आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जखमी झालेल्या वृद्ध महिलेला तातडीने उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रावले, अमळनेर पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पाळधी पोस्टचे गणेश बुवा, पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेबाबत धरणगाव पोलीस स्टेशन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















