जळगाव मिरर | २ जानेवारी २०२५
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाची घटना ताजी असतांना आता केज तालुक्यातील कळमअंबा येथील सरपंचाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे.
‘आपल्याला पंकजाताईंना भेटून निधी आणण्यासाठी मुंबईला जायचे आहे,’ असे म्हणून कळमअंबा (ता. केज) येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर इंगळे यांचे त्यांचा मित्र कारेगावचा माजी सरपंच दत्ता तांदळे याने बुधवारी अपहरण केले. पाटोदा येथे नेऊन इंगळेंना एका खोलीत डांबले. त्यांचा एक हात व एक पाय एकमेकांना बांधून पायात लोखंडी पट्टी ठाेकून त्याला कुलूप लावले. त्यांच्याजवळील अडीच लाख रुपयेही लुटले. कशीबशी दोरी तोडून इंगळे यांनी सुटका करून घेत थेट तांबा राजुरी गाव गाठले. तेथील नागरिकांच्या मदतीने इंगळेने थेट बीडचे पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून आपबीती सांगितली. केज तालुक्यातीलच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व खून केल्याची घटना गाजत असताना त्याच तालुक्यातील आणखी एका माजी सरपंचाचे अपहरण झाल्याने खळबळ उडाली आणखी एका ‘सरपंचा’चे अपहरण आहे. अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी त्यांचे म्हणणे एेकून घेत गुन्हा दाखल केला.
ज्ञानेश्वर इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दोन-तीन दिवसांपासून दत्ता तांदळे हा कारेगाव येथील माजी सरपंच आपल्याला पंकजाताईंना भेटून २० लाखांचा निधी आणायचा आहे. त्यासाठी मुंबईला जाण्याचा आग्रह करत होता. १० टक्के कमीशन देऊन हा निधी आणायचा असे तो सांगत होता. बुधवारी मुंबईला जाण्याचे नियोजन ठरले होते. पहाटे पाच वाजता इंगळे हे केज येथील कळंब चौकात आले होते. तिथून ते दत्ता तांदळे याच्या कारमध्ये बसले. १० टक्के कमिशन देण्यासाठी त्यांनी सोबत २ लाख ६० हजार रुपये घेतले होते. केजहून निघून ते सकाळी ७ वाजता पाटोदा शहरात आले. इथे आल्यावर तांदळे याने इंगळेंना शहराबाहेर असलेल्या एका खोलीत नेले. तिथे आधीच दोघे हजर होते. तिघांनी इंगळे यांना मारहाण केली. त्यांच्याकडील पैसे काढून घेतले. त्यांचा मोबाईल काढून घेतला. फोन पे चा पासवर्ड विचारला. फोन पे वर त्यांचे ५० हजार रुपये होते. त्यानंतर त्यांनी इंगळे यांचा डावा हात डाव्या पायाला साखळी बांधली आणि पायात बेडीसारखी लोखंडी पट्टी टाकून त्याला कुलूप लावले. पण नंतर कशीबशी सुटका करुन घेत इंगळेने जीव वाचवला.