जळगाव मिरर | १ जुलै २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी नदी व धरणात पोहताना बुडून होण्याच्या घटना वाढल्या असतांना आता सुट्टीच्या दिवशी चार बालमित्रांना पोहण्याचा मोह अनावर झाला. पण यातील एक जण घरी अाई वाट बघत असेल म्हणून माघारी फिरला आणि पोहण्याचा मोह अनावर झालेल्या ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. सोमवारी सकाळी ९ वाजता नाशिक शहरातील बिडी कामगार नगर रोडवर एका बांधकाम साइटवर खोदलेल्या खड्ड्यात तिघांचेही मृतदेह एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात हातात हात पकडलेल्या स्थितीत अाढळले.
सविस्तर वृत्त असे कि, बिडी कामगारनगरातील साई हिलाल जाधव (१४), साई केदारनाथ उगले (१४) अाणि साई गोरख गरड (१५, सर्व रा. बिडी कामगारनगर) हे जिवलग मित्र रविवारी गरडच्या म्हशीच्या गोठ्यावर गेले होते. गायीच्या वासरासोबत खेळले. गंगेवर पोहण्यास जाऊ असे ठरले होते. गरडच्या वडिलांनी घरी लवकर जा, असे बजावले. काही वेळ थांबून चौघे मित्र घरी निघाले. पबनर याने अाईला सांगितले नव्हते. आई वाट पाहतेय म्हणून तो घरी गेला. तिघे जण शेजारील बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी उतरले.
मात्र पाण्याचा अंदाज न अाल्याने तिघेही गाळात रुतून बुडाले. रविवार दुपारपासून १२ तास शोध : तिघे ‘साई’ रविवारी दुपार पासून बेपत्ता होते. रात्री २ वाजता मिसिंग तक्रार दिली. रात्रभर नातेवाइकांनी तिघांचा पहिणे, त्र्यंबक, सोमेश्वर, गंगापूर धरण, गोदाघाट आदी परिसरात शोध घेतला. मात्र सकाळी तिघांचे मृतदेह साईटवर पाण्यात अाढळून अाले. अभिषेक गरड यांनी गोठ्या शेजारील बांधकाम साईटवर बघितले असता तिघांचे कपडे सापडले. अग्निशामक दल, पोलिसांनी शोध घेत तिघांचे मृतदेह पाण्यात गाळात रुतल्याचे आढळले. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पालक व नातलगांनी मृतदेह कवटाळत केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
साई हिलाल जाधव हा दत्तक मुलगा होता. जाधव मूळचे धुळे येथे राहणारे. कामानिमित्त ते नाशिकमध्ये अाले होते. मूलबाळ नसल्याने धुळ्यात राहणारे मोठे भाऊ यांच्याकडून ५ महिन्यांचा असताना साईला दत्तक घेतले होते. तर, साई उगले हा एकुलता एक मुलगा होता.
