जळगाव मिरर | १५ जुलै २०२५
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या राजीनाम्याच्या आणि भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अखेर मौन सोडले आहे. गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये त्यांच्या राजीनाम्याची चर्चा गाजत असताना, जयंत पाटील यांनी विधानभवनात माध्यमांशी बोलताना स्वतःची भूमिका स्पष्ट केली. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी कुणी मला विचारलेले नाही आणि मीही कुणाला विनंती केलेली नाही. तरीही माझ्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू आहेत. मी कुठे जाणार हे माध्यमांनीच ठरवून टाकले आहे, याचे मला आश्चर्य वाटते, असे जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी वृत्तवाहिन्यांमध्ये झळकले होते. भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनादेखील उधाण आले होते. त्यातच जयंत पाटील हे नाराज असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वावड्याही अनेकदा उठल्या. आता जयंत पाटील माध्यमांसमोर येत या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे.
एखादा प्रदेशाध्यक्ष असणारा माणूस, त्याच्याबाबत एवढ्या वावड्या उठणे, तो कोणत्या पक्षात जात आहे, याबाबत तुम्हीच सगळे ठरवायला लागले. मला आश्चर्य वाटते. मला आताच सहाय्यकाने बातमी पाठवली की, बातम्या चालू आहे. मलाही आश्चर्य वाटतंय. सूत्र कुठे आहेत मला दाखवा जरा. मला त्या सूत्रालाच भेटायचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
कुणी कुणाशी बोलले तरी त्याची बातमी होते. एखाद्या साध्या गोष्टीसाठी कुणी कुणाला भेटले तरी, आपण पराचा कावळा करतो. त्यामुळे अशी कोणतीही परिस्थिती नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. मी त्या पक्षाचे काम करतो. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.
भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी कुणी मला विचारलेले नाही आणि मी कुणाला तशी विनंती केलेली नाही. भाजपने माझ्याशी थेट संपर्क साधलेला नाही. भाजपमध्ये जे अनेक प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मी व्यक्तीगत वैर कुणाशी करत नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्याशी बोलले, मुख्यमंत्र्यांना भेटलो की त्या पक्षात जाणार अशी चर्चा होते, असेही जयंत पाटील म्हणाले.
आपण पक्ष बदलणार असल्याच्या बातम्या नेहमीच माध्यमामधून दिल्या जातात. पण मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करत आहे. मी पक्ष बदलाच्या बातम्यांना कधी खोडून काढत नाही. कारण माध्यमे अशा बातम्या सारख्या देत असतात. कालांतराने या बातम्या मागे पडतात. त्यामुळे प्रत्येकवेळी बातमी आल्यानंतर त्यावर उत्तर देत बसणे मला संयुक्तिक वाटत नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत अध्यक्षपद सोडण्याचे आणि नवीन चेहऱ्याला संधी देण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर शरद पवार यांनीही जयंत पाटील यांच्या भूमिकेवर सकात्मकता दाखवली होती. मात्र शनिवारी जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरु झाली. शेवटी जयंत पाटील यांनीच समोर येऊन मी प्रदेशाध्यक्षपदी अजूनही असल्याचे सांगितले.
