जळगाव मिरर / ९ डिसेंबर २०२२
राज्यातील नाशिक जिल्ह्यात अपघाताची मालिका संपता संपत नाही. कालची बस अपघाताची बातमी ताजी असताना आज सिन्नरच्या मोहदरी घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून यात जवळपास पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नाशिक- सिन्नर महामार्गावर काल दुपारच्या सुमारास बस अपघाताची घटना ताजी असतानाच नाशिक सिन्नर रस्त्यावरील मोहदरी घाटात भयंकर अपघात झाला असून एका वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यात जवळसपास पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची समजते आहे. सिन्नर जवळील मोहदरी घाटात स्विफ्ट कारचे नियंत्रण सुटल्याने ही कार डिव्हायडर तोडून कार पलीकडच्या लेनवर जाऊन दोन वाहनांवर आदळली. यात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व राहणार नाशिकचे असून एका लग्न सोहळ्यानिमित्त संगमनेरला गेले होते.
दरम्यान आज दुपारी साडे वाजेच्या सुमारास अपघात झाला असून अपघातानंतर घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली. यानंतर तातडीने माळेगाव एमआयडीसी पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचले. यातील जखमींना सिन्नर रुग्णालयात हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.दरम्यान सिन्नरच्या बाजूंकडून नाशिककडे स्विफ्ट कार येत होती. यामध्ये चार जण प्रवास करत होते. मोहदरी घाटात आल्यानंतर कारचे टायर फुटले. टायर फुटल्याने स्विफ्ट कार डिव्हायदर तोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली. दुसऱ्या लेनमधून प्रवास करणाऱ्या इनोव्हा आणि एका दुसऱ्या स्विफ्टला धडक दिली. अपघातानंतर टायर फुटलेल्या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून अपघाताची दाहकता दिसून येत आहे. सद्यस्थितीत सर्व गाड्या मोहदरी घाटातून हलविण्यात आल्या आहेत. तर इतर गाड्यातील जखमींना रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.