जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२६
जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही प्रचाराचा जोर वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १-ब मधील अपक्ष उमेदवार चेतन सुरेश महाले यांच्या प्रचाराने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. रविवार, दि. ११ जानेवारी रोजी चेतन महाले यांच्या वतीने भव्य प्रचार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
या मिरवणुकीत प्रभागातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. घोषणाबाजी, फलक, बॅनर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले होते. प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत चेतन महाले यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा व्हिजन मतदारांसमोर मांडला. विशेष म्हणजे, या प्रचार मिरवणुकीत महाले परिवारातील सर्व सदस्य सक्रियपणे सहभागी झाले होते. कुटुंबीयांचा हा सहभाग मतदारांच्या मनाला भावून गेला. प्रचारादरम्यान कुटुंबातील एकजुटीचे आणि भावनिक चित्र पाहायला मिळाले.
१० महिन्याच्या चिमुकलीसह वहिनी प्रचारात
या मिरवणुकीतील सर्वात भावनिक क्षण म्हणजे चेतन महाले यांच्या वहिनी सीमा महाले यांचा सहभाग. त्यांनी आपल्या अवघ्या १० महिन्यांच्या चिमुकलीला कुशीत घेऊन प्रचारात सहभाग नोंदवला. हा क्षण अनेक नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. “विकासासाठी आणि भविष्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य मैदानात उतरला आहे,” असा संदेश या दृश्यातून मिळत होता.
नागरिकांनीही या भावनिक सहभागाचे कौतुक करत चेतन महाले यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात चेतन महाले यांनी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत असून, त्यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता पाठिंबा चर्चेचा विषय ठरत आहे. प्रभाग १-ब मध्ये विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार चेतन महाले यांनी व्यक्त केला असून, निवडणुकीच्या अंतिम दिवसांत त्यांचा प्रचार अधिकच वेग घेत असल्याचे दिसून येत आहे.




















