
जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना असतांना आता बीड जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ आज सकाळी आठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अपघात एवढा भीषण होता की, भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने सहा पादचाऱ्यांना चिरडले. हे सर्वजण पेंडगाव येथे देवदर्शनासाठी निघाले होते, अशी प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर परिसरात घबराट आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. मृत व जखमींची नावे अद्याप स्पष्ट झाली नसून, पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान, अपघात नामलगाव फाटा उड्डाणपुलाजवळ झाला.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच गढी उड्डाणपुलाजवळ अशाच पद्धतीने एका कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या भरधाव वेगावर आळा घालण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, कंटेनरचा चालक ताब्यात घेण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.





















