दै. बातमीदार । १४ जुलै २०२३ ।
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मोठ बंड करून मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांच्यासोबत सत्तेत भागीदारी केली आहे. अनेक दिवस सुरु असलेल्या चर्चेवर काल खाते वाटप करून सर्वच मंत्री आपापल्या कामाला जरी लागले असले तरी शिंदे गटातील काही मंत्री नाराज असल्याच्या चर्चा जोर धरीत आहेत. दरम्यान खातेवाटपाबाबत उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेनेत केलेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे गटाकडून सरकारमधून बाहेर पडण्याबाबत अनेक कारणे देण्यात आली होती. यामध्ये एक कारण हे अजित पवार अर्थमंत्री असून ते शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत, असा आरोप करण्यात आला होता. मात्र आता अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पुन्हा अजित पवारांकडेच अर्थ खातं देण्यात आलं आहे. यावरून नेमकं काय घडलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यादरम्यान संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. अर्थ खाते तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्री पद हे अजित दादांना द्या असं दिल्ली ने सांगितलं, या गोष्टीवरून एकनाथ शिंदे मागे आले, ही माझी पक्की माहिती आहे असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे.
काल झालेले मंत्रिमंडळ खातेवाटप आणि मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार यांच्या पार्श्वभूमिवर संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. पण त्यांचं काय करायचं आहे याचा निर्णय होत नसल्याचे संजय राऊतांनी स्पष्ट केलं. त्यांचे 17-18 लोक आमच्या संपर्कात आहेत, पण त्यांचं काय करायचं आहे याचा निर्णय होत नाहीये, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान आज नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शासन आपल्या दारीं या उपक्रमात जनता त्यांच्या दारी जात नाही, त्यांना महत्व देत नाही. या कार्यक्रमात रेशन दुकानदारांना प्रत्येकी पन्नास माणसे आणायला सांगितले आहे. इथे सभेसाठी माणसे आणली जातात तसे जबरदस्तीने माणसे आणली जातात असेही राऊत म्हणाले. जनता कोणाच्या दारात जाते हे लवकरच कळेल, असा दावा राऊतांनी केला आहे.