जळगाव मिरर | १४ जुलै २०२३
राज्यातील महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेले ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याने आता शरद पवारांसह उद्धव ठाकरे व त्यापाठोपाठ राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून राज यांनी कोकणातून या दौऱ्याला प्रारंभ केला आहे.
दापोली, चिपळून आणि खेड येथील मनसे कार्यकर्त्यांशी राज ठाकरेंनी पक्षबांधणी संदर्भात संवाद साधला. खेडमध्ये भाषण करताना राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच खेडमधील जनता मनसेच्या उमेदवारांना नक्की साथ देतील, असा विश्वासही राज ठाकरे यांनी बोलून दाखवला होता.
यावेळी राज ठाकरे म्हणाले कि, निवडणुकीआधी कोणासोबत आणि निवडणुकीनंतर कोणासबोत, अशी मतदारांची प्रतारणा मी करणार नाही. मला ते जमणार नाही. निवडणुकीत एकासोबत आणि नंतर दुसऱ्यासोबत जाण्याला राजकारण म्हणत असेल, तर मी राजकारणात नालायक असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. लोकांनी रंग बदलणाऱ्या राजकारणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी युती भावनीक आहे तर राष्ट्रवादीसोबत पुढील काळात भावनीक होईल, असे मत व्यक्त केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे बोलत होते. जनता शांत बसल्याने राजकारण्यांना फायदा होत असल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील नेते राजकारण किती गलिच्छ होत आहेत, हे जनतेने पाहावे. हम करे सो कायदा अशी सत्ताधाऱ्याची परिस्थिती असल्याचे राज ठाकरे म्हणाले. राजकीय नेते कसे रंग बदलतात हे देखील जनतेने पाहावे, असे आवाहन देखील राज यांनी केले. आगामी काळात होणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. या संदर्भात कालच त्यांनी स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेचे आव्हान इतर पक्षांसमोर असेल हे स्पष्ट झाले आहे.