जळगाव मिरर | १ जुलै २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यात हिंदी सक्तीवरून मोठा वाद सुरु असतांना आता या मोर्चाच्या अगोदर आणि विधिमंडळाचे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्ती निर्णयाचा जीआर रद्द करत असल्याचे जाहीर केले. अशातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून जहरी टीका केली आहे. वाघ यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक कविता शेअर केली आहे. या कवितेतून त्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत टीका केली आहे. सामनात छापला इंग्रजीत मथळा करून ठेवा फ्रेम, अशांना कधीच जाग येत नसते, जे घेतात झोपेचं सोंग, ओळखा पाहू कोण? असे म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तर चित्रा वाघ यांच्या याच कवितेला शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
कशासाठी आमदार व्हायचं असतं काय करू लागली.. जनतेचे प्रश्न सोडून, कविता करू लागली.. ऐकून कविता यांची जनता आता हसू लागली.. इतकं भंपकपणा बरा नव्हे ! बस कर पगली…असे म्हणत रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
विरोधाला विरोध म्हणजेच उबाठा अर्थशून्य…. बडबड अन् नुसताच बोभाटा…. बेडकी यांच हिंदुत्व अन् बेडकी भाषाप्रेम…. सामनात छापला इंग्रजीत मथळा करून ठेवा फ्रेम…. विसरुन जातात सारे काही दिल्या कितीही स्मरण गोळ्या….. कधी काढले फोटो अन् कुठे केल्या सह्या…. कुठेच पुरावे नसतात नुसतंच करतात ढोंग….. अशांना कधीही जाग येत नसते जे घेतात झोपचं सोंग…. असतो असा अर्विभाव जणू हे म्हणजे मराठीची हमी…. भाषेत मात्र टाळ्या घेतात….. म्हणून कम अॅान किल मी…..असे भाजप आमदार चित्रा म्हणाल्या आहेत.
