जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२५
महाराष्ट्रात दररोज ८ शेतकरी आत्महत्या करतात, मात्र मूलभूत बाबींकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. ग्रामीण भागाचा विकास होईल तरच राज्याचा विकास साधला जाईल. रस्ते, पाणी, गटार या मूलभूत सोयीसुविधा आणि धर्मनिरपेक्ष विकास यावर आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. निवडणूक पूर्ण ताकदीनीशी लढणार आहोत. जळगावकर नागरिक देखील एक नवीन पर्याय शोधत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत कमीत कमी ५० टक्के जागा लढवणार असल्याचे सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजहर तांबोळी यांनी सांगितले.
प्रसंगी पत्रकार परिषदेला प्रदेश सचिव राहील हनीफ, अब्दुल्ला खान, आदी उपस्थित होते. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची आज जळगावात जिल्हा प्रतिनिधी परिषदेची बैठक घेण्यात आली. त्यात जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात अध्यक्ष मतीन देशपांडे, उपाध्यक्ष कासीम नदवी, सचिव अरबाज शेख, सचिव सोहेल शेख, चिराकुद्दीन शेख, सदस्य अमीन पटेल, अल्ताफ असगर, अबूजर मिर्झा, हादी अंसारी, जुनेद शेख, सय्यद जुनेद यांची निवड करण्यात आली.
ते पुढे म्हणाले की, जळगावात मूलभूत बाबींचा अभाव आहे. आम्ही एक वर्षापासून काम करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावातील अडचणी वाढवल्या. मूलभूत सोयसीविधांचा अभाव आहे. राज्यात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. इडीमुळे पक्ष बदलाची परंपरा सुरू झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
अल्पसंख्यांक मंडळात १००० कोटींचा घोटाळा झाला आहे. काही निवडक जिल्ह्यांना आणि निवडक लोकांना कर्ज देण्यात आले आहे. बारामती आणि सिल्लोडमध्ये बेसुमार कर्ज वाटप केले आहे. ८ वर्षापासून ऑडिट झालेले नाही. मालमत्ता रजिस्टर नाही. उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असे ते म्हणाले. तसेच लूट माजवण्यासाठी संघटितपणे काम सुरू आहे. वक्फ बोर्डबाबत देखील तेच झाले आहे. मशिदीच्या भोंग्यामुळे प्रदूषण होत असल्याचे किरीट सोमय्या सांगत असून पोलीस त्याचे पालन करत आहेत. भाजपला साजेसे काम पोलीस करत आहेत. बांगलादेशी संदर्भात एसआयटी गठीत करण्यात आली मात्र काहीही हाती लागले नाही, असा आरोप केला आहे.
भाजप, संघ, संघ विचारसरनी आणि एनडीए सोडून इतर पक्षांशी आम्ही चर्चा करत आहोत. तिसरी आघाडी म्हणून आम्ही विचार करत आहे. महाविकास आघाडी ही भाजपची बी टीम आहे. बरेच लोक भाजपच्या दावणीला बांधले गेले आहेत. भाजप लहान मोठ्या आणि प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा विचार करत आहे. काँग्रेस अद्याप घराणेशाही विचारातून बाहेर पडलेली नाही, असे त्यांनी सांगितले
