
जळगाव मिरर | ८ मार्च २०२६
शहरातील खोटे नगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीन महिन्यांपुर्वी मुलाचे निधन झाल्यामुळे नैराश्यात असलेल्या प्रभाकर लक्ष्मणराव देशमुख (वय ६७, रा. खोटेनगर) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार दि. ६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खोटे नगरात प्रभाकर देशमुख हे पत्नीसह वास्तव्यास होते. तीन महिन्यांपुर्वी त्यांच्या मुलाचे आकस्मीक निधन झाल्याने देशमुख हे नैराश्यात होते. तसेच ते काही दिवसांपासून आजारी देखील होते. त्यामुळे कंटाळलेल्या प्रभाकर देशमुख यांनी राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
ही घटना सकाळच्या सुमारास त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली, जावई असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















