जळगाव मिरर | १७ जुलै २०२५
शहरातील प्रेम नगरातील महाराणा प्रताप हायस्कूलजवळ मंगळवारी रात्री गतिरोधकावर दुचाकीवर उधळून झालेल्या अपघातात सासरी आलेल्या सागर रामचंद्र सूर्यवंशी (वय ३२, रा. रावळगाव ता. मालेगाव) हे या दुचाकीस्वार जावयाचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील सागर सुर्यवंशी यांचे जळगाव शहरातील दशरथ नगरातील सासूरवाडी आहे. सोमवार दि. १४ रोजी ते कामानिमित्त दुचाकीने सासुरवाडीला आले होते. मंगळवार दि. १५ जुलै रोजी रात्री ते दुचाकीने प्रेमनगरातील महाराणा प्रताप हायस्कूल जवळून जात असताना गतिरोधकावर त्यांची दुचाकी आदळली गेली.
दुचाकवरुन ते रस्त्यावर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी सुर्यवंशी यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषित केले. बुधवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
