
जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२५
रस्ता ओलांडून डिझेल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर जाणाऱ्या रिक्षाला रिक्षाचालकासह पाच जण जखमी झाले. हा अपघात दि. १५ ऑगस्ट रोजी रात्री विमानतळाच्या पुढे झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील खडकी येथील रिक्षाचालक साहिल राजेंद्र भोई (वय २२) हे रिक्षामध्ये (एमएच १९ बीएम ०५४६) घरगुती साहित्य घेऊन जळगावकडून जामनेरकडे जात होते. कुसुंबा गावानजीक पेट्रोलपंपावर डिझेल भरण्यासाठी रिक्षा उजव्या बाजूला वळवून रस्ता ओलांडत असताना भरधाव एमएच १९ सीझेड ९७५१) क्रमांकाच्या कारने रिक्षाला धडक दिली. यात रिक्षाचालक साहिल भोई तसेच रिक्षात बसलेले कलाबाई वसराम नाईक, नागेश विजय नाईक, विकास तेजमल नाईक, हरेश्वर पंडीत नाईक (सर्व रा. खडकी, ता. जामनेर) हे जखमी झाले. याप्रकरणी साहिल भोई यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कारचालक देवेंद्र कोल्हे (रा. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों गफ्फार तडवी करीत आहेत.




















