जळगाव मिरर | १३ जुलै २०२५
मुक्ताईनगर ते मलकापूर मार्गावर शनिवारी दि. १२ दुपारी एक गंभीर अपघात घडला. गौण खनिज वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने एस. टी. बसला जोरदार धडक दिल्याने बसचा चालक आणि अन्य १८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर आगाराची बस (मुक्ताईनगर-मलकापूर) दुपारी मलकापूरकडे जात असताना तरोडा ते रुईखेडा दरम्यान गौण खनिजाने भरलेला एक डंपर प्रचंड वेगात समोरून आला आणि त्याने थेट बसला जोरदार धडक दिली. धडकेमुळे बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस, आपत्कालीन कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील ग्रामस्थांनीही मदतीचा हात पुढे करत जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवले.
जखमींपैकी ७ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अन्य जखमींवर मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधित डंपर चालकावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
