जळगाव मिरर । ३१ ऑक्टोबर २०२५
चोपडा तालुक्यातील अडावद येथील वडगाव रस्त्यावरील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर कलिंगड भरलेल्या ट्रकने मोटरसायकलीस जोरदार धडक दिल्याने मोटरसायकली वरील २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी अडावद येथे घडली.
सविस्तर वृत्त असे कि, अडावद येथील पोलीस स्टेशन समोरील वडगाव रस्त्यावर आज दि. ३० रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चंदसनी, कमळगाव, वडगाव येथील शेतातून टरबूज भरून अडावद कडे येत असलेल्या मालट्रक क्रमांक आर. जे.४० जी. ऐ.४१९६ या वरील चालकाने आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याची परिस्थिती न पाहता चालविल्याने समोरून येणाऱ्या बजाज कंपनीच्या मोटारसायकल क्रमांक एम. एच. १९ एन. ५९७९ हिस जोरदार धडक दिल्याने मोटरसायकली वरील तरुण आकाश ज्ञानेश्वर पाटील रा. इंदिरानगर प्लॉट ह्या जागीच गतप्राण झाला. अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस स्टेशनचे हे. कॉ. शेषराव तोरे, सुनील तायडे, किरण शिरसाठ, फिरोज तडवी, पो. कॉ. भूषण चव्हाण, प्रदिप पाटील, जयदीप राजपूत, विजय बच्छाव, अक्षय पाटील, दिलीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तसेच मयताचे शव उत्तरीय तपासणीसाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. पोलिसांनी अपघाती ट्रक व मोटारसायकल पोलीस ठाण्यात जमा केली आहे.
अपघातग्रस्त वडगाव रस्ता हा दुतर्फा अतिक्रमणाने गुदमरलेला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य तसेच अतिक्रमित वस्तू ठेवलेले असल्याने वाहन चालकांना या रस्त्यावर वाहन चालवताना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागते. अपघाताच्या वेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर याविषयी संताप व्यक्त केला. आकाश हा गरीब कुटुंबातील होतकरू तरुण होता आपल्या वडिलांच्या दुकानात तो मदत करत होता. गॅरेज वरून दुपारच्या जेवणासाठी घरी येत असताना हा अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, काका काकू असा मोठा परिवार आहे. अडावद येथील बस स्टॅन्ड जवळील दोस्त ऑटो गॅरेज हे मालक बापू पाटील यांच्या आकाश हा पुतण्या होता.

 
			

















