जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२६
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम अंतिम टप्प्यात येऊन ठेपली असताना प्रभाग क्रमांक १ ड मधील अपक्ष उमेदवार भारतीताई सागर सोनवणे यांच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. प्रचारादरम्यान प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भारतीताईंचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
सामाजिक कार्यकर्ते सागर सोनवणे यांच्या पत्नी असलेल्या भारतीताई सोनवणे यांनी प्रभाग १ ड मधून अपक्ष उमेदवारी दाखल केली असून त्यांच्या साधेपणा, सामाजिक बांधिलकी आणि काम करण्याच्या तळमळीमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
प्रचारादरम्यान भारतीताईंनी प्रभागातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व महिलांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. “प्रभागातील प्रत्येक समस्या ही माझी स्वतःची समस्या आहे. निवडून आल्यास नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरेल असे काम करून दाखवीन,” असा शब्द त्यांनी मतदारांना दिला.
नागरिकांशी थेट संवाद साधत, घराघरांत जाऊन समस्या जाणून घेणारी भारतीताईंची प्रचारशैली प्रभागात चर्चेचा विषय ठरत असून, येत्या निवडणुकीत त्यांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





















