जळगाव मिरर | ७ जुलै २०२५
राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता बुलढाणा जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाने प्रसन्न झालेल्या मनांना परतीच्या प्रवासात एकाएकी मोठा हादरा बसला. आषाढी वारीहून भाविकांना घेऊन परतणाऱ्या एसटी बसला आज (दि.७) पहाटे चिखली शहराजवळ अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्ता दुभाजकाला धडकून उलटली, ज्यामुळे खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, खामगाव आगाराची एसटी बस (क्र. एमएच ४०, वाय ५८३०) पंढरपूरहून ५२ भाविकांना घेऊन परतीच्या मार्गावर होती. पहाटे सुमारे पावणेदोनच्या सुमारास, चिखली शहरातील महाबीज प्रक्रिया केंद्रासमोर चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे वेगात असलेली बस थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली. रात्रीची वेळ असल्याने आणि बहुतांश प्रवासी झोपेत असल्याने बसमध्ये मोठा गोंधळ उडाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने चिखली आणि बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या १५ प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही सर्वात मोठी दिलासादायक बाब ठरली. “पांडुरंगाच्या कृपेनेच आम्ही या मोठ्या संकटातून वाचलो,” अशी भावना अपघातातून बचावलेल्या भाविकांनी व्यक्त केली. या घटनेमुळे वारीहून परतणाऱ्या इतर प्रवाशांमध्ये मात्र काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
