
जळगाव मिरर | संदीप महाले
जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात भव्य खान्देश महोत्सवाचे आयोजन केले असले तरी जळगावकर नागरिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसले आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सागर पार्क मैदानावर जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने भव्य खान्देश महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन दरम्यान महाराष्ट्र गीताचा आयोजकांना विसर पडला होता तर दुसऱ्या दिवशी शुक्रवार रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान मुख्य व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असले तरी हे कार्यक्रम बघण्यासाठी जळगावकर नागरिकांनी उत्साह दाखविला नाही. मोजके 80 ते 100 नागरिक या व्यासपीठा समोर बसलेले दिसत होते. तर यानंतर झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात देखील अनेक खुर्च्या खाली आढळून आल्या. या सांस्कृतिक कार्यक्रमात ज्या शाळांनी सहभाग घेतला होता त्याच शाळेचे विद्यार्थी व शिक्षक व पालक देखील उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या दोन दिवसात चांगलाच फज्जा उडाला असल्याचे चित्र आहे.
शासकीय निधी असूनही जळगावकर येईना…
जळगाव महानगरपालिकेच्या या कार्यक्रमाला शासनाचा निधी असतो त्यामुळे या कार्यक्रमाचे मोठे आयोजन करत असतात. मात्र या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कमी पडत असल्याचे चित्र समोर येत आहे. जर शासनाच्या पैशावर हा कार्यक्रम सुरू असेल तर मग जळगावकर जनतेला अद्याप या कार्यक्रमाची कशी माहिती पडली नाही हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
… त्यापेक्षा खाजगी कार्यक्रम बरे…
याच मैदानावर गेल्या महिन्यात बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला जळगावकर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती या कार्यक्रमांमध्ये अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले होते. त्यामुळे दरवर्षी जळगावकर नागरिकांना बहिणाबाई महोत्सवाचे नेहमीच आकर्षण असून या कार्यक्रमाची नागरिक उत्साहाने वाट बघत असतात मात्र खानदेश महोत्सव कार्यक्रम नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादाच्या भोवऱ्यात अडकत असल्याचे चित्र देखील समोर येत आहे.





















