
जळगाव मिरर | ५ सप्टेंबर २०२५
हिमाचल प्रदेशातील हिंदुस्तान-तिबेट मार्ग (राष्ट्रीय महामार्ग ५, ता. रामपूर, जि. शिमला) वरील बिथल (कालीमिट्टी) परिसरात दि. ३ रोजी झालेल्या अपघातात जळगावच्या लक्ष्मी विराणी ठार झाल्या. मुसळधार पावसामुळे डोंगरावरून अचानक मोठमोठे दगड घसरून एका खासगी बसवर कोसळले. या भीषण दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये लक्ष्मी विराणी यांचा समावेश आहे. तसेच १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
घटनेनंतर तात्काळ पोलीस व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमी प्रवाशांना महात्मा गांधी वैद्यकीय सेवा केंद्र, खानरी (रामपूर उपजिल्हा) येथे दाखल करण्यात आले आहे. मृतदेह सध्या रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा प्रशासनाने शिमला जिल्हा प्रशासन तसेच हिमाचल प्रदेश शासनाशी तातडीने संपर्क साधला. मृतदेह रामपूरहून शिमला आणि येथून चंडीगड येथे आणण्यात येणार आहे. चंडीगड हून मुंबईला विमानाने मृतदेह आणण्यात येणार असून त्यानंतर मुंबईमार्गे जळगावला उद्या दि. ५ रोजी आणण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.




















