जळगाव मिरर | २३ डिसेंबर २०२५
चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारामुळे आपला पराभव झाल्याच्या रागातून अपक्ष उमेदवार राकेश भीमराव बोरसे यांच्या घरावर दगडफेक करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ रोजी दुपारी २.४५ वाजता स्वामी विवेकानंद कॉलनीत घडली असून, या प्रकारामुळे बोरसे कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभाग क्रमांक ३ मधून एका पक्षाचा उमेदवार पराभूत झाला असून, त्यास अपक्ष उमेदवार कारणीभूत असल्याचा आरोप करत शिवराज पाटील, रोहित चौधरी, अजय राजपूत, नीलेश चौधरी यांच्यासह अन्य काही जणांनी बोरसे यांच्या घरासमोर जाऊन मोठमोठ्याने शिवीगाळ केली. “तुम्ही अपक्ष का उभे राहिलात? तुमच्यामुळे नितीन पाटील यांचा पराभव झाला” असे म्हणत आरोपींनी घरावर दगडफेक केली. यात घराच्या काचा फुटून नुकसान झाले. इतकेच नव्हे तर आरोपींनी बोरसे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ३५१ (२), ३५१ (३), ३५२, ३२४ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.





















