
जळगाव मिरर / ९ जानेवारी २०२३
राज्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थीना महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 21 मार्चपर्यंत ही परीक्षा चालेल. तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च यादरम्यान होईल. नाशिक विभागात दहावीच्या परीक्षेसाठी दोन लाखांहून अधिक तर बारावीच्या परीक्षेसाठी दीड लाखांहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट होतात.
राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिकसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंडळाकजून जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रक बाबत सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार पालक, शिक्षक व शिक्षक संघटनांच्या प्राप्त झालेल्या सूचनांची दखल घेत इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु होईल. सर्वसाधारण व द्विलक्षी विषय, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या सर्व विषयांची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 पर्यंत चालेल. तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावीची परीक्षा दोन मार्चपासून सुरू होऊन 25 मार्चपर्यंत चालेल. मंडळाच्या संकेतस्थळावर अधिकृत वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळातर्फे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे. विद्यार्थी व पालकांनी अधिकृत वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी करावी अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सअप किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये.




















